आंगण्यांची आंगणेवाडी ! जत्रा शनिवार दि. 02/03/2024

Bharadi Temple

– झुंजार पेडणेकर (मसुरे)

मालवण शहरापासून १५ की. मी. वर आडारी पूल, महान गाव मागे टाकल्या नंतर मालवण – बेळणा – कणकवली या राज्य मार्गावर वसलेली वाडी म्हणजेच देवी भराडी च्या अधिवासाने पावन झालेली आंगणेवाडी होय. या ठिकाणी जवळपास आठ लाख भाविक यात्रोत्सवासाठी येतात. त्यामुळे या एक दिवसासाठी या यात्रेचे नियोजन कसे चालते, येथील लोकांचे वेगळेपण,चाली रीती आदि गोष्टींबाबत माहिती घेणे क्रमप्राप्त ठरेल.आंगणेवाडीत प्रवेश करण्यासाठी या मुख्य रस्त्या सोबतच मसुरे येथून दत्त मंदिर मार्गे व कांदळगाव तसेच बागायत मार्गे रस्ते आंगणेवाडीत येतात.येथील ९५ ट्क्के ग्रामस्थ ‘ आंगणे ’ या आडनावाचे असल्यानेच त्यांची वस्ती असलेली वाडी म्हणजेच आंगणेवाडी होय. मसुरे गावातील या वाडीस त्या मुळेच आंगणेवाडी हे नाव पडले.

जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला गाव म्हणजे मसुरे होय.या गावातील एकूण १५ महसूली गावांपैकी आंगणेवाडी हा एक महसूली गाव होय. मसुरे ग्रामपंचायतीच्या पाच वॉर्ड पैकी आंगणेवाडीचा समावेश वॉर्ड क्रमांक एक म्ध्ये होतो. येथील एकूण लोक्संख्या ३५० असून १७२ पुरूष १७८ महिला आहेत.एकूण मतदारांची  संख्या २४३ असून पुरूष मतदार १०५ तर महिला मतदार १३८ आहेत. येथील घरांची संख्या १६० आहे. आंगणेवाडीचे एकूण क्षेत्रफळ ५३८ हेक्टर आहे. शेती खालील क्षेत्र १६१ हेक्टर, जंगल १८ हेक्टर, तर पडिक जमिन साधारण १९२ हेक्टर आहे. गावातील एकूण कुटुंबांची संख्या १२३ आहे. आंगणेवाडीला लागणारी पाण्याची गरज ५८ खाजगी विहीरी, दोन सार्वजनिक विहीरी, चार विधन विहीरी मार्फत भागविली जाते. महसूल विभागाचे एक तलाठी कार्यालय येथे आहे. शैक्षणिक सोई संदर्भात आंगणेवाडी येथे एक अंगणवाडी,पहिली ते चौथी साठी जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा आहे. माध्यमिक शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना बिळवस माध्यमिक विद्यालय येथे जावे लागते. संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत हागंदारीमुक्त गावाची संकल्पना जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहे. गावात सतरा ठिकाणी  स्ट्रिट लाईट तसेच सौर पथदिपांची सोय आहे.

संपूर्ण आंगणेवाडीचे एकच भजन मंडळ असून आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या माध्यमातून मुंबईतील व गावातील कलाकार एकत्र येउन नाटक सादर करतात. यात्रोत्सवा नंतर मंदिर लगतच्या रंगमंचावर नाटक सादर करण्यात येते. येथे एक सार्वजनिक वाचनालय तसेच महिला मंडळ कार्यरत आहे. आंगणेवाडीच्या विकासा साठी आंगणेवाडी  कुटुंबीय सर्व सदस्य नेहमी झटत असतात. येथील विकासा संबंधित सर्व कामे मंडळाच्या नेहमी होणा-या बैठकांमधून एकमेकांच्या विचाराने पुर्ण केली जातात. येथील ग्रामस्थांमध्ये असलेल्या एकजूटीमुळे आंगणेवाडी एक आदर्श गाव ठरतो. कुठल्याही ग्रामस्थांमध्ये वैचारिक मतभेद नाहीत. एकमेकांच्या साथ व संवादातून सर्व कामेपूर्ञ होतात. मुंबईमंडळाच्यावतीने दरवर्षी मुंबईत वार्षिक स्नेहसंमेलन होते. यावेळी मुंबईतील सर्व आंगणेवाडीकर ग्रामस्थ एकत्र येतात. लहान मुलांच्या गुणदर्शन कार्यक्रमांसोबत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा केला जातो. गावातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना काही प्रमाणात आर्थिक व वस्तूरूपाने मदत दिली जाते. दरवर्षी यात्रोत्स्व संपल्यानंतर मंडळाच्या बैठकी मध्ये झालेल्या यात्रोत्सवा बद्दल चर्चा केली जाते व यात्रेमधील नियोजनात काहीत्रुटी असल्यास याबाबत विचार विनिमय केले जाते.

काही सणांच्या बाबतीत आंगणेवाडीत वेगळेपण जाणवते. होळीचा सण येथे धुमधडाक्यात साजरा केला जातो. होळीचे सर्व पाचही दिवस वाडीतील सर्व पुरुष मंड्ळी रात्री मुक्कामासाठी भराडी मातेच्या देवालयात असतात. येथे होळीचा मांड भरतो. त्याचप्रमाणे अष्टमीचा कृष्ण जन्माचा मांड वाडीतील एकाच घरात असतो. याच ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन गोकुळाष्टमीचा आनंद लुटतात.गणेश चतुर्थीच्या दिवसात फक्त येथील ग्रामस्थ आपल्या घरी भजन आयोजीत करु शकतात. व तशी परवानगी देवीने दिली आहे. इतर वेळी भजन करावयाचे झाल्यास ते भराडी देवीच्या मंदिरा मध्ये करावे लागते. त्याच प्रमाणे येथील ग्राम स्थांना सत्यनारायणाची पुजा घालावयाची असल्यास ती देवीच्या मंदिरा मध्येच घालावी लागते. दर मंगळवारी देवालयामध्ये स्थानिक  भजन मंडळाच्यावतीने भजन करण्यात येते. एक मुख्य व चार इतर असे पाच सुवर्ण कलश असलेले व राजस्थानी कारागिरांच्या हस्त कलेतून साकारलेले भराडी देवीचे मंदीर म्हणजे स्थापत्य कलेचा उत्तम नमुनाच आहे. साधारण २० वर्षापुर्वी मुख्य मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू होऊन पुढील वर्षापर्यंत हे काम पुर्ण होणार आहे.

या ठिकाणी मंदिर जीर्णोद्धारासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत वापरली जात नाही. देवीवर असलेल्या श्रद्धेपोटी प्रत्येकाला येणारे अनुभव, देवीचा वरदहस्त लाभावा म्हणून अनेक भाविक, राजकीय पुढारी, उद्योजक, नेतेमंडळी यथाशक्ती सढळहस्ते मदत करतात.त्याचप्रमाणे मुंबईला असलेली आंगणे मंडळी आपल्या मासिक वेतनातील काही रक्कम दर महिन्याला एकत्र करतात. येथील अनेक ग्रामस्थ डॉक्टर, इंजिनीअर, यशस्वी उद्योजक, उच्च पदस्थ नोकरी व अन्य क्षेत्रामध्ये आपला ठसा  उमटवून आहेत. यात्रा कालावधीमध्ये आंगणेवाडीत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येते.येथील मुख्य पीक म्हणजे भात होय. त्याच्या जोडीला काही प्रमाणात भुईमुग,नाचणी, वैगरे केली जाते. तसेच झेंडूची फूल शेती व कलींगड सुद्धा पीकवू लागले आहेत.

आंगणेवाडीत असलेली संपूर्ण दारूबंदी हे आणखी एक वैशिष्ठ या वाडीचे आहे. आंगणेवाडी मध्ये इतर कोणत्याही जाती धर्माचे लोक नाहीत. आंगणेवाडीचा समावेश तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणून यापूर्वीच झाला आहे. देवी भराडी मातेच्या कृपेने आंगणेवाडीची ख्याती संपूर्ण देश – विदेशात झाली आहे. त्यामुळेच की काय या आंगणेवाडीला गावाचेच स्वरुप आले आहे!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

 

Scroll to Top
Scroll to Top