नवसाला पावणारी आंगणेवाडीची शक्तिदायीनी देवी भराडी !

– झुंजार पेडणेकर ( मसुरे )

आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रेचे स्वरुप  झपाट्याने बदलत आहे. हजारोच्या पटीत भरणारी ही यात्रा लाखाच्या घरात गेली आहे. यात्रेच्या दिड दिवसात येथे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते व कमाईत अनेक कुटुंबांच्या सहा महिन्यांच्या रोजी रोटीची आई भराडी तजबीत करते. भराडी देवीवर असलेल्या श्रध्देचा परिणाम म्हणून भक्तीचा हा स्त्रोत यात्रेत झालेले बदल स्विकारून असाच व यापुढील यात्रांमध्ये दिसून येणार आहे. कारण नवसाला पावणारी व हाकेला धावणारी देवी भराडी अशी ख्याती आंगणेवाडीच्या या देवी भराडीची झाल्याने देवी दर्शनाने मिळणा-या समाधाना मध्ये, आनंदा मध्ये तसुभर सुध्दा कमी होणार नाही आहे……………

काळ बदलतो तसा मानव बदलत जातो. हे कालचक्र थांबवणे कुणाच्या हातात नाही. त्याप्रमाणे बदल स्विकारणे हा सुध्दा एक जिवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. बदलत्या काळात चिंतेने ग्रासलेल्या प्रत्येकाला तुझ्यावर माझी छाया आहे. तु संकटात सापडलास की फक्त हाक मार मी सदैव पाठीशीच आहे. अशी मसुरे आंगणेवाडीच्या आई भराडी मातेच्या कृपाछत्राची अनुभुती महाराष्ट्राच्या काना कोप-यात असलेल्या भक्तना येत आहे. मातेचा आशीर्वाद सदोदीत असतोच परंतू तिच्या सोहळ्यात साक्षीदार होण्यचा योग वर्षतून एकदाच लाभतो. व हा योग यावर्षी शनिवार दि. 02/03/2024 रोजी मिळणार आहे. अलीकडच्या काही वर्षात आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. अगदी बैलगाडी पासून चालू झालेली वाहतूक आजपर्यत हॅलीकॉप्टर वर येऊन थांबली आहे. एकमेकाना हाक देण्यासाठी वापरल्या जाणा-या कुका-यांपासून आता मोबाईल च्या मीसकॉल, व्हॉटस्अ‍ॅप पर्यंत ! देवीची महती जसजशी दुरवर पसरत गेली तसतसा भाविकांचा ओघ या यात्रेत वाढू लागला.

भाविकांची संख्या वाढल्याने व्यापारी सुध्दा व्यापा-याच्या उद्देशाने यात्रेत दुकाने थाटू लागले. त्याकाळी आंगणेवाडी सह लगतच्या परिसरातून यात्रोत्सवामध्ये जाणा-या ग्रमस्थाना बैलगाडीचाच आधार वाटायचा. बैलगाडीची खडखड, बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज आज कुठेतरी हरवलाय एव्हढं मात्र नक्की. आसपासच्या १५ ते २० कि. मी. परिसरातील ग्रामस्थ यात्रेतून परतीची वाट कधी धरतात तेच समजत नाही. पायवटांचे कच्चे रस्ते झाले, कच्या रस्त्यांचे पक्के रस्ते झाले. बदल घडत गेल्याने वाहतुकीच्या सोईसुविधा वाढल्या. पूर्वीच्या काळी चाकरमानी बोटीतून मुंबईवरून  यायचे. मालवणला बोटचा प्रवास संपल्यावर पुढे आडारी खाडी पार करून पुन्हा वाहतुकीच्या तत्सम साधनाने आंगणेवाडी मध्ये पोहोचता यायचे. परंतु बदल कसा झाला बघा मागील तीन वर्षे तर खास यात्रेसाठी कोकण रेल्वेच्या जादआ फे-या सोडण्यात आल्या आहेत.

नवसाला पावणा-या या देवीची ख्याती सर्वदूर आहे. दर वर्षागणिक यात पुष्कळच फरक पडला आहे. व्यापार बदलला, प्रवासाची सोय बदलली. त्यामुळे जुन्या यात्रेची थ्रील कुठेतरी हरवल्या सारखे वाटते. आजच्या व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकच्या जमान्यात सकाळी ८ वाजता यात्रेची तारीख निश्चित झाली की काही सेकंदात यात्रची तारीख सर्वदूर पसरते. सध्याच्या प्लेक्सच्या जमान्यत त्वरीत डिजीटल फकल सुध्दा झळकतात. यात्रेच्या दिवसात याच प्लेक्सच्या बॅनराची गर्दी झालेली जाणवते. पूर्वीच्या काळी विजेचा थांगपत्ता नसताना फर्गोलॅक्स कंपनीचे पेट्रोमॅक्स हेच प्रकाशाचे माध्यम असायची. त्यामुळे हा गॅस बत्तीचा प्रकाश सुध्दा भरपूर वाटायचा. आता गॅसबत्तच्या जागी बल्प आले. त्यानंतर ट्यूबलाईट, व हॅलोजन करता करता यात्रेत आता हायमास्ट दिवे प्रकाश देत आहेत. जत्रेत येणा-या बालगोपाळना पूर्वी वडाच्या पारंब्याना झोका घ्यावासा वाटायचा. पण आता चित्र नेमकं उलटं बनलं आहे. पदर मोड करून पालक आपल्या मुलांसह स्वत:ची सुध्दा आकाश पाळण्यात बसण्याची हौस भागवून घेत आहेत. मागील दहा पंधरा वर्षात एस. टी. चे लाल डबे धुरळा उडवत जायचे. गाडी बाजुने गेली की कपडे रंगुन जायचे. आता खाजगी वाहनांची संख्या बेसुमार वाढलेली दिसते.

जत्रेमध्ये लाखो भाविक येत असल्याने कायदा सुव्यवस्था तसेच घातपाती कारवाया होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून जागतीअसते. साधारण महिना भर आधी जिल्हाधिकारी पातळीवर याचे नियोजन होते. त्यामुळे पोलीस दलाच्या माध्यमातन विचार केल्यास ही यात्रा म्हणजे डोकेदुखी वाटणारी म्हटले तर भक्ताना राग यायला नको. मागील पंधरा वर्षाचे चित्र खुपच वेगळं होतं. पोलीस दलाची एखादी गाडी यात्रेमधुन फेरी मारुन जायची. जणूकाही सारे सुसेगाद असल्यागत. जत्रेमध्ये हॉटेलचा अभाव असल्याने तसेच खिशामध्ये पैसे सुध्दा कमी असल्याने परिसरातील ग्रामस्थ भल्यापहाटे जातानाच दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन जायचे. एखाद्या मोठ्या झाडाखाली बसून घरातून आणलेली भाकरी चटणी सर्वात वाटून खाल्ली जायची. यासर्वात आता बदल होऊन यात्रेतील चायनीजच्या हंगामी हॉटेलांवर तर उड्या पडलेल्या दिसून येतात. यात्रेत फिरून झाल्यावर मालवणी खाज्याच्या दुकानावर यात्रेचा प्रसाद म्हणून खडखडे लाडू , चुरमु-याचे लाडू, गुळाची वडी याच्या खरेदीवर गर्दी असायची. परंतू आता हातात बोजा नको म्हणून चाकरमानी केवळ प्रसाद म्हणून पूडी घेताना आढळून येतात. यात्रेत यावे आणि शांतपणे फिरावे ही परिस्थिती आता राहीली नसून ‘ पीक अवर्स’ मध्ये तर धक्के खातच चालावे लागते.

आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रेचे स्वरुप सुध्दा बदलत असून काही वर्षापूर्वी हजारोंच्या उपस्थितीत संपन्न होणारी ही यात्रा आता लाखो भाविकांच्या उपस्थितीत होत आहे. यात्रेच्या दिड दिवसात येथे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते व या दिड दिवसाच्या कमाईत अनेक कुटुंबांच्या सहा महिन्यांच्या रोजी रोटीची आई भराडी तजबीज करते. यात्रेसाठी येणा-या चाकरमान्या सोबत त्यांचा मित्रपरिवार सुध्दा मोठ्या प्रमाणात मुंबई वरून येतो. त्यामुळे यात्रा समाप्ती नंतर जिल्हातील इतर प्रेक्षणिय स्थळांना पर्यटना निमित्त भेटी देण्यात येतात. त्यामुळे मसुरे गावासह जिल्ह्यातील पर्यटन व्यावसाईकांचा मोठा फायदा या यात्रेच्या निमीत्ताने होतो. भराडी देवीवर असलेल्या श्रध्देचा परिणाम म्हणून भक्तीचा हा स्त्रोत यात्रेत झालेले बदल स्विकारून असाच व यापुढील यात्रांमध्येही दिसून येणार आहे. कारण नवसाला पावणारी व हाकेला धावणारी देवी भराडी अशी ख्याती आंगणेवाडीच्या या शक्तिदायीनीची झाल्याने देवी दर्शनाने मिळणा-या आनंदामध्ये तसुभर सुध्दा कमी होणार नाही आहे !

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

 

Scroll to Top
Scroll to Top