कोकण मुलखाची महादेवी आंगणेवाडीची देवी भराडी !

Bharadi Devi Malvan

– झुंजार पेडणेकर (मसुरे)

आंगणेवाडीची भराडी माता सर्वच भक्तांना भरभरुन देते. तिच्या यात्रेत सहभागी होणं म्हणजे भाग्याच समजल जातं. त्यामुळे सर्वच वयोगटातील भक्त यात्रेच्या दिवशी लाखोंच्या संख्येने आंगणेवाडीत येतात. प्रत्येकाची केवळ एकच इच्छा असते, मातेच दर्शन ….! देवी भराडी चरणी असलेल्या भक्तीच्या शक्तीची प्रचीती घेण्यासाठी, आत्मसुख अनुभवण्यासाठी मात्र तुम्हाला आंगणेवाडीतच यावं लागेल. गुरुवार दि. २४/०२/२०२२ रोजी हा योग येणार आहे. या ठिकाणी पोहोचल्या नंतर मिळणारी शक्ती, उर्मी, चैतन्य काय असते याची अनुभुती प्रत्येकाला आल्या शिवाय राहत नाही. या यात्रेविषयी थोडेसे…..

कोकण आणि येथील परंपरा एक वेगळ नात आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात प्रत्येक गावात दिवाळी नंतर जत्रांना सुरवात होते. या जत्रा या ठरावीक तिथीलाच होत असतात. मात्र आंगणेवाडीच्या देवी भराडी मातेची यात्रा यास अपवाद आहे. ‘देवीच्या हुकमाने ठरेल तो यात्रेचा दिवस’ असे या यात्रेचे स्वरुप असल्याने हे एक वेगळेपण मुद्दाम नमुद करावे लागेल.मसुरे गावची एक वाडी असलेल्या आंगणेवाडीच्या देवी भराडीने मने जोडण्याचे मोठे काम केले आहे. सध्याच्या श्र्द्धा अंधश्रद्धेच्या युगात भराडीमाता जगभरातील लेकरांवर कृपाशिर्वाद ठेवून आहे. व याची प्रचीती प्रती वर्षी भावीकांच्या वाढत गेलेल्या संख्ये वरून येते. ही यात्रा साधारणपणे पंधरा लाख भाविकांच्या उपस्थितीची झाली आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने आंगणेवाडीने आपले नाव भाविकांच्या मनात कोरले आहे.

यात्रेच्या तारखेची निश्चीती देवीच्या हुकमाने

या जत्रेची सुरवात नक्की कधी सुरु झाली याविषयी निश्चीत अशी माहीती मिळत नसली तरी साधारणपणे ३०० वर्षापूर्वी पूजा अर्चा सुरु झाल्याचे जाणकार सांगतात. याजत्रेचा दिवस ठरविण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. त्याच प्रमाणे एकदा ठरविलेली तारिख कोणत्याही परिस्थितीत बदलली जात नाही.जत्रेचा दिवस निश्चित करण्यासाठी साधारण २ महीने पुर्वीच म्हणजे देवदिवाळी नंतर डाळप विधी म्हणजेच डाळी मांजरी बसण्याचा कार्यक्रम होतो. यानंतर गावपारधी साठी देवाचा कौल होतो. जंगलामध्ये पारध म्हणजेच डुक राची शिकार झाल्यानंतर मोठ्या उत्साहात या डुकराची मिरवणूक काढली जाते. यानंतर दुस-या किंवा तिस-या दिवशी डाळी विधी झाल्यानंतर सगळे ग्रामस्थ मंदिरात जमा होऊन देवीचा कौल घेतात व तारीख निश्चित होते. यात्रेदिवशी अगदी पहाटे गर्दी होत असल्याने मागील काही वर्षे ओट्या भरण्यास पहाटे तीन वाजल्यापासूनच सुरवात करण्यात येते. उत्सवा दिवशी देवीची मुर्ती अलंकारांनी सजवीली जाते. पाषाणात मुखवटा घालून साडीचोळी नेसवीली जाते. मानक-यांच्या ओट्या भरल्या नंतर देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले होते. यात्रेच्या दिवशीची पहाट भाविकांच्या गर्दीनेच उजाडते. लगतच्या गावातील भावीक अगदी भल्या पहाटे दर्शन रांगेत राहून देवीचे दर्शन घेतात व कृतार्थ होतात. देवीची ओटी, खण, नारळ, सोन्याच्या लाण्यानी भरली जाते. नवस असल्यास त्याप्रमाणे गोड पदार्थ, पेढे, मीठाईचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो. तमाम भाविक काही तास रांगेत राहून देवीचे दर्शन घेतात. नवस बोलणे,फेडणे,तुलाभार सुद्धा केला जातो.

महाप्रसादाचा अनुपम्य सोहळा

पहाटे पासून सुरू असलेला ओट्या भरण्याचा कार्यक्रम रात्री ९ नंतर बंद होतो. व यानंतर आंगणेवाडीतील प्रत्येक घरातील स्त्रियांनी बनवीलेला प्रसाद देवीला नैवेद्य म्हणून दाखविला जातो. ताटे लावण्याचा हा कार्यक्रम वैशिष्ठ पूर्ण असतो. प्रसाद घेऊन माघारी परतताना हा प्रसाद भावीकांना वाटला जायचा परंतू यावेळी हा प्रसाद मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी व्हायची. प्रचंड चेंगराचेंगरी मुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी व्यव स्थापनाच्या वतीने देवालयाच्या मागील बाजूस प्रसाद देण्यास प्रारंभ करण्यात आला. या ताटे लावण्याच्या कार्यक्रमानंतर आंगणेवाडीच्या प्रत्येक घरात प्रसादासाठी पंगती बसतात. अगदी अनोळखी लोक सुद्धा या पंगतीत दिसून येतात.समस्त आंगणे कुटुंबिय प्रसादासाठी घरी येणा-या भाविकांना पाहुण्यांचा मान देऊन त्यांना प्रसादाला बसवतात.

मोड जत्रेने यात्रेची सांगता :

जत्रोत्सवात साधारणपणे २ कीमी पर्यंत दुकाने थाटली जातात.लहान मुलांसाठी आकाश पाळणे, फनी गेम्स, आदि असतात. सर्व प्रकारच्या वस्तू याजत्रेत मिळत असल्याने लाखो रुपयांची उलाढाल या दोन दिवसात होते. जत्रेच्या मुख्य दिवसाच्या दुस-या दिवशी मोड जत्रा असते. या दिवशी आंगणे कुटुंबीय ओट्या भरतात. सायंकाळी उशिरा गर्दीचा ओघ कमी झाल्या नंतर मंदिराच्या गाभा-याची स्वच्छता होते व धार्मिक पद्धतीने यात्रेची सांगता होते. जत्रेच्या तिस-या दिवशी पारंपारीक गोंधळाचा कार्यक्रम होतो.
ग्रामस्थांच्या घरी देवीचा फोटो नाही

आपण घरामध्ये सर्व देवदेवतांचे फोटो लावतो. परंतू आंगणेवाडीच्या भराडी देवीचे छायाचित्र सापडणे मुश्किल. अगदी आंगणेवाडीतील आंगणे कुटुंबियांच्या घरी सुद्धा ! देवीचे चित्र कुणीही छापू नये अथवा प्रसिद्ध करू नये असा एक प्रघातच आहे. आंगणेवाडीची भराडी बाई अवघ्या महाराष्ट्राची जननी बनली आहे. या देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याने प्रत्येकाची मनोकामना पुर्ण होते.आंगणेवाडी कुटुंबीय भाविकांना गैरसोय होउ नये यासाठी नेहमीच नाविन्य पूर्ण योजना राबवीत असतात.

भाविक हाच केंद्र बिंदु मानून एकंदर सर्व नियोजन त्यांच्या कडून केले जाते. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भावीक या जत्रेला येतात. भराडी देवी मुळे आंगणेवाडीची पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रसिद्धी दुरवर झाली आहे. विविध पक्षाच्या राजकारण्यांची मांदियाळी या जत्रेत अनुभवता येते. आजच्या जत्रोत्स्वाच्या दिवशी लाखो भाविक भराडी बाईच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. कठीण प्रसंगी देवीला हाक मारा, देवी तुमच्या मदतीस निश्चित धावेल अशी भावीकांची अढळ श्रद्धा बनल्याने देवीच्या मंदिरात पंढरीच्या पांडुरंगा प्रमाणे, शिर्डीच्या श्री साईबाबां प्रमाणे सदैव भक्तांचा ओढा असतो. मनाला प्रचंड उर्जा देणा-या, प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणा-या देवी भराडी चरणी माझे कोटी प्रणाम.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

 

Scroll to Top
Scroll to Top